तमक श्वास

*तमकश्वासालाच व्यावहारिक भाषेत दमा म्हणतात.
*याप्य व्याधी.
*आमाशयसमुद्भव व्याधी
*श्वासाचे वारंवार वेग येतात.
*कुलज हेतूचा विचार करावा.
*श्वासवेगाचे वेळी डोळ्यासमोर अंधेरी येते.
*श्वासाचे वेग रात्रीच्या वेळी / अंधाराच्या वेळी येतात.

संप्राप्ति

*आमाशयातील प्रकुपित झालेला कफ हा प्राणवह स्त्रोतसात विमार्गग होतो.

*वायुही स्वकारणांनी प्रकुपित झालेला असतो.

*या प्रकुपित वायूमुळे संकुचित , कठीण , रूक्ष झालेल्या श्वासनलिकांमध्ये विमार्गग कफाने अधिकच अवरोध होतो.

*प्राणवायूला प्रतिलोम गती प्राप्त होते.

*तमकश्वासाचा वेग येतो.

पूर्वरूप

*पीनस , कास , घशात घुरघुर असा आवाज येणे.

लक्षणे

*पूूू्र्वरूपावस्थेतील लक्षणे अधिक व्यक्त होतात.
*श्वासाचा वेग हा कफकालामध्ये , शीतकालामध्ये , रात्रीच्या वेळी अधिक असतो.
*शीतऋतुमध्ये आकाश ढगाळलेले असताना कफकर आहार विहारामुळे तमकश्वासाचा वेग येतो किंवा आलेला असेल तर अधिक वाढतो.
*वेग आला असताना कास हे लक्षण प्रामुख्याने आढळते.
*खोकल्याची ढास लागते.
*कफ मात्र लवकर सुटत नाही.
*जीव कासावीस होतो.
*कफ पडून गेला की थोडावेळ आराम वाटतो.
*पुन्हा थोड्याशाच वेळात पुन्हा खोकला सुरु होतो.
*घसा सतत खवखवत असतो.
*बोलने सकष्ट होते.
*श्वास वेग वाढतो.
*रूग्णास झोपले असता अधिक श्वास वाढतो व उठून बसले असता थोडे बरे वाटते.

।। आसिनो लभते सौख्यं , शयानो श्वासपीडितः ।।

*श्वास व त्याबरोबरच कासाचे वेग तीव्र स्वरूपात आल्यास मोह उत्पन्न होतो , काही सुचेनासे होते , डोळे सुजल्यासारखे वाटतात , कपाळावर , छातीवर घाम अधिक प्रमाणात येतो.

*व्याधी कफवातप्रधान असल्याने शैत्याने वृध्दि होते तर उष्णोपचाराने उपशय मिळतो.

*कफप्रधान श्वासामध्ये कफष्ठीवन अधिक प्रमाणात असते.खोकल्याची ढास त्यामानाने कमी असते.कफही
त्यामानाने लवकर सुटतो.उर:परिक्षणांमध्ये आर्द्र कफध्वनि मिळतात.

*वातभूयिष्ठ श्वासामध्ये खोकला अगदी कोरडा असतो.बरेच खोकल्यानंतर अगदी थोडासा कफ सुटतो.उर:परिक्षणात फुफ्फुसात सर्वत्र रूक्ष वातध्वनि आढळतात.वातप्रधान तमकश्वास अधिक त्रासदायक प्रकार आहे.

प्रतमक श्वास
तमकश्वासामध्ये जेव्हा ज्वर आणि मूर्च्छा ही लक्षणे अनुबंधी म्हणून उत्पन्न होतात.

उदावर्त , धूळ , धूर , अजीर्ण , शरीरात कोणत्याही कारणाने क्लिन्नता वाढणे , अतिवृध्दावस्था असणे किंवा वेग विधारण करणे यांनी प्रतमक श्वास उत्पन्न होतो.

संतमक श्वास

*ज्वर , मूर्च्छा आदि पित्तप्रधान लक्षणांनी युक्त असणाऱ्या या प्रकारात जेव्हा डोळ्यांंसमोर अधिक प्रमाणात अंधेरी येते . 

*रूग्णास आपण अंधारात बुडून गेल्यासारखे वाटत राहते . 

* श्वास वेगास मानसिक प्रक्षोभ कारणीभूत असतो .

चिकित्सा

वेगकालीन चिकित्सा :-

बलवान रूग्णास कफभूयिष्ट तमकश्वास असताना वमन , विरेचन , धूम इ. उपचार हितकर ठरतात.

रोगी दुर्बल वातभूयिष्ट श्वासाचा असेल तर शमन उपचार करावेत.त्यास स्नेह , यूष , रस आदींचे सहाय्याने संतर्पण करावे.

कफभूयिष्ट श्वासात वमनाचा उत्तम उपयोग होतो.

पूर्वकर्म
*वमनापूर्वी उरोभागी लवण +सैंधव यांनी अभ्यंग करावे.
*अभ्यंतर स्नेहासाठी तिलतैल वापरावे.
*स्निग्ध द्रव्यांनीच स्वेदन करावे.
*यामुळे ग्रथित कफाचे विलयन होऊन तो पातळ होतो - सुटा होतो.
*स्त्रोतसे मृदु होतात .
*वातानुलोमनही घडते.
*अशावेळी रूग्णास पुन्हा स्निग्ध पदार्थ खाण्यास देऊन कफोत्क्लेश करावा व वमन द्यावे.

प्रधान कर्म
*वमनासाठी मदनफळ , वचा , यष्टीमधु , पिप्पली , सैंधव , मध आदि द्रव्यांचा वापर करावा.
*उत्क्लेश चांगला झाल्यावर आकंठ पानासाठी लवणजल , इक्षुरस , यष्टीमधु फांट यापैकी कोणत्यातरी द्रवद्रव्याचा वापर करावा.

*वमनामुळे दुष्ट , स्त्यान , ग्रथित असा कफ पडून जातो व स्त्रोतसे मोकळी झाल्यामुळे लगेच श्वास वेग कमी होतो.

*वमनानंतर काही शेष दोष कंठप्रदेशी लीन होऊन राहणे शक्य असते. त्यासाठी धूमपान करून त्या दोषांचे शमन करवावे.

धूमपानासाठी धत्तूरपत्र , मनःशिला , बाजरीचे पीठ यासारख्या उष्ण , तीक्ष्ण , वातानुलोमक द्रव्यांचा वापर करावा.

तमके तु विरेचनम् । (च.चि.१७/११९)

*तमकश्वासात प्राणवायूला प्रतिलोम गती प्राप्त झालेली असते.
*प्राणाची प्राकृत गती अधोभागी स्वरूपाची असते.
*विरेचनाने प्राणास त्याची प्राकृत गती प्राप्त करून दिली जाते.
*विरेचन हा कफावरील महत्त्वाचा उपक्रम आहे.

शोधनानंतर शमन उपचार करावेत . रोगी दुर्बल असेल तर शोधन न करता सुरूवातीपासूनच शमनोपचार करावे लागतात.

वातप्रधान श्वासात चिकित्सा
स्नेहपान 
तिलतैल २-२ चमचे गरम करुन किंवा गरम पाण्याबरोबर वारंवार दिल्याने फायदा होतो.
चंदनबलालाक्षादि तैल आणि नारायण तेल यांचाही वेगकालीन अवस्थेत चांगला उपयोग होतो.

कफभूयिष्ठ श्वासात चिकित्सा

श्वासकुठार

श्वासाच्या वातभूयिष्ठ व कफभूयिष्ठ या दोन्ही प्रकारात उपयुक्त 
कनकासव 
कंटकार्यावलेह
यष्टीमधु कल्प
धान्यादि अवलेह
समीरपन्नग रस

श्वासात अनेक वेळा आत्ययिक अवस्था निर्माण होते.
सद्यफलदायी उपक्रम
*उरोभागी स्नेहन , स्वेदन चालू ठेवावे.
*नारायण तैल २-२ चमचे / गरम यष्टीमधु फांटाबरोबर दर ५ - १० मिनिटांनी द्यावे. वेग कमी होईपर्यत हा उपक्रम चालू ठेवावा.
*मनःशिला , यष्टीमधु , धत्तूरपत्र यांच्या साहाय्याने धुरी देणे.

अवेगकालीन चिकित्सा

स्थानाला बल देणारी रसायन चिकित्सा करावी लागते.

प्राणवह स्त्रोतसाला बल प्राप्त होण्यासाठी चौसष्टी पिंपळी किंवा वर्धमान पिंपळी प्रयोग लाभदायक ठरतो.

आमलकीचे विविध कल्प हे फुफ्फुसाला बल देणाऱ्या द्रव्यांंत अग्रगण्य समजले जाते.

च्यवनप्राशावलेह , धात्री अवलेह , विशेष लाभदायी.

भल्लातकाचे विविध कल्प रसायन म्हणून उपयुक्त

पथ्य

*धूर , धूळ , गार वारा यापासून दूर राहिले पाहिजे.
*शीत , विदाही , अग्निमांद्यकर असे पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे.
*श्वासाचे वेग रात्री येत असल्याने व जेवणानंतर स्वाभाविक कफप्रकोप होत असल्याने रोग्याने रात्रीचे जेवण टाळले पाहिजे.
*सायंकाळी लवकर व तोही अल्पप्रमाणात , लघु , द्रव असा आहार घेतला पाहिजे.
*आहारात द्रव , उष्ण , लघु , दीपन , पाचन करणारी द्रव्ये अधिक प्रमाणात हवीत.
*लसूण व आले दररोज आहारात असले पाहिजे.
*स्नान व पानासाठीही गरम पाणी वापरावे.

समशर्कर चूर्ण  + हिंग्वाष्टक चूर्ण + कर्पूरादि चूर्ण प्रत्येकी १ ग्रँम दिवसातून ३ वेळा गरम पाण्याबरोबर दिल्यास तमकश्वासाचे पुनःपुन्हा येणारे वेग थांबविता येतात.

रसपर्पटी २५० मिली ग्रँम दिवसातून ३ वेळा घृतशर्करेबरोबर दिल्याने पुनःपुन्हा येणारे वेग थांबविता येतात.

अपुनर्भव चिकित्सा
वर्षाऋतूपूर्वकाळात दिलेले वमन अधिक लाभदायी ठरते.

वर्षाऋतू सुरु झाल्यानंतरही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महास्त्रोतसावर कार्यकारी , उत्कृष्ट दीपन , पाचन , ग्राही गुण असणारी संजीवनी गुटी २ गोळ्या दिवसातून ३ वेळा देणे लाभदायी ठरते.

भल्लातकासव ४ चमचे २ वेळा जेवणानंतर पाण्याबरोबर देणे .

Comments